Solapur Siddheshwar Yatra 
सोलापूर

Solapur Siddheshwar Yatra : सिद्धरामेश्वरांच्या नामघोषात 68 लिंगांना तैलाभिषेक

‌‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...‌’चा जयघोष

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ‌‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय‌’ नामघोषात व भक्तिरसाने ओथंंबलेल्या वातावरणात निघालेल्या नंदीध्वजांच्या डौलदार मिरवणुकीने सोमवारी (दि.12) श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 शिवलिंगांना तैलाभिषेक घालण्यात आला. या तैलाभिषेकाने सोन्नलगीच्या भूकैलासातील सिद्धरामेश्वरांच्या पाच दिवसांच्या पावन यात्रेस प्रारंभ झाला.

सोमवारी सकाळी आठ वाजता उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले. यावेळी काशी जगदगुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, आ. विजयकुमार देशमुख, खा. प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार आदींची उपस्थिती होती. सकाळपासून हिरेहब्बू वाडा, मल्लिकार्जुन मंदिर परिसरात बाराबंदी पोशाख आणि पांरपरिक पांढऱ्या रंगाच्या पोशाखाने गजबजून गेले होते. नंदीध्वज पूजेनंतर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज मार्गस्थ झाले.

हिरेहब्बू यांच्या हातात सिद्धरामेश्वरांचा योगदंड होता. श्रींची व नंदीध्वजांचे दर्शन घेण्यासाठी मिरवणूक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. नंदीध्वज एक- एक गल्ली पार करीत सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होत असताना भाविकांनी तैलाभिषेकासाठी तेल अर्पण केले. पंचकट्टा येथे सिध्दरामेश्वर पंचकमिटीच्यावतीने श्रींची पूजा करण्यात आली. नंदीध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जुन्या फाटकाजवळ आली.

या यात्रेत झेंडा ग्रुप अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होती. ज्याठिकाणी नंदीध्वज थांबविले जातात त्यावेळी सर्वांनी थांबावे असा इशारा या ग्रुपमार्फत लाल झेंडा फडकावून देण्यात येतो. त्यानुसार सिद्धेश्वर भक्त आणि नंदीध्वज मार्गक्रम करीत होते. सिद्धरामेश्वरांचा अखंड जयघोष यावेळी सुरु होता. तेथे ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या परंपंरेनुसार हिरेहब्बूंना देशमुख कुटुंबियांच्यावतीने सरकारी आहेर करण्यात आला. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास नंदीध्वज आल्यानंतर सिध्देश्वर मंदिर परिसरातील 68 लिंगातील पहिल्या अमृतलिंगाजवळ आल्यानंतर तैलाभिषेक करुन मानकऱ्यांना विडा देण्यात आला. शिवयोगी योगसमाधी व गर्भ मंदिरातील श्रींच्या गदगीस तैलाभिषेक घालून हिरेहब्बू यांनी विधिवत पूजा केली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उर्वरित लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदिध्वजांची मिरवणूक मंदिरातून मार्गस्थ झाली. मिरवणुकीने रात्री उशिरा नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात दाखल झाले.

आज अक्षता सोहळा

श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात आपल्या योगदंडाशी कुंभारकन्येचा विवाह लावून दिला होता. त्याचेच प्रतिक म्हणून दरवर्षी मकर संक्रांतीच्या भोगी दिवशी सिध्दारामेश्वरांचा विवाह सोहळा पार पडतो. आज मंगळवारी दि. 13 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सम्मती कट्याजवळ नंदीध्वजांच्या साक्षीने अक्षता सोहळा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT