सोलापूर

Solapur Shri Ganesh Temple : शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने उजळले श्री गणेश मंदिर

कार्तिकी संकष्टीनिमित्त मंगळवेढ्यात भक्ती अन् उत्साहात दीपोत्सव; भजनसंध्या कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : कार्तिकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून शहरातील बाजार चौकातील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी शेकडो पणत्यांच्या उजेडात दीपोत्सव मोठ्या उत्साहात व भक्‍तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सांगली येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या मंदिरात ‘श्री गणेश परिवारा’च्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून अखंडितपणे हा दीपोत्सव साजरा केला जातो.

पहाटे मंत्रोच्चारात श्री गणेश मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. होमहवन व अथर्वशीर्ष पठणानंतर श्रींची आरती झाली. दिवसभर आणि सायंकाळी असंख्य गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी आयोजित भजनसंध्या कार्यक्रमात सोलापूरचे भजनरत्न ह.भ.प. पुण्यवंत वाघमारे, पंढरपूरचे ह.भ.प. योगेंद्र महाराज व सहकाऱ्यांनी बहारदार भक्तीगीते, अभंग व भजने सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

दीपोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई, पणत्यांची आरास आणि फटाक्यांची आतषबाजी मंगळवेढेकरांचे विशेष आकर्षण ठरली. मंदिर परिसरातील विहिरीमध्ये पेंटर सदाशिव जामदार यांनी थर्माकोलच्या सहाय्याने साकारलेले ‘ब्रह्मकमळ’ लक्षवेधी ठरले. जहाँगीर मुलाणी, मुनीर मुलाणी व असीफ पटेल यांनी नयनरम्य विद्युत रोषणाई केली. तसेच शेख रांगोळी आर्टचे जैनुद्दीन शेख व सहकाऱ्यांनी साकारलेली श्री गणेशाची भव्य रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

तसेच देवयानी देशमुख, श्रावणी करमरकर, पूजा करमरकर, श्रावणी मायदेव, मधुरा मायदेव, यश करमरकर व अनिल मेलगे यांनीही सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर देशमाने, भालचंद्र देशमुख, अमोल माने यांच्यासह श्री गणेश परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकाश, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम असलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT