श्रीपुर : माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रीपूर शहरात एकूण 3 पेट्रोल पंप असले, तरी त्यापैकी 2 पंपांवर पेट्रोलचा साठा संपला आहे. सध्या केवळ एका पंपावरच पेट्रोल उपलब्ध आहे. त्यामुळे या पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळत आहे. अनेकांना दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत आहे.
पेट्रोल मिळवण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबलचक रांग लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. काही वाहनधारकांना पेट्रोल न मिळाल्याने परत जावे लागत असल्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित पेट्रोल पंप चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील डेपोतून नियमित प्रमाणात पेट्रोलचा कोटा मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने पंपांवरील साठा लवकर संपत आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याची झळ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाहनधारकांना रोजच्या कामकाजासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाने लवकरात लवकर पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.