सोलापूर : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या दोन दिवसांतील सोलापूर शहर-जिल्ह्यातील दौऱ्यानंतर मंगळवारी अनपेक्षितपणे शिवसेनेची शहर जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणींसह सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्यात आले.
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुख, युवा सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे बोलेले जात आहे.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यानंतर पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी यासंदर्भातील पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. पक्ष पदाधिकाऱ्यांना तसे निरोप धाडले. त्यामुळे निष्क्रिय, कामचुकार आणि केवळ पदाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. नवीन नियुक्त्या करताना संपर्कप्रमुखांचा अहवाल निर्णायक ठरणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.