सोलापूर

Solapur News: शिरनांदगीत सापडला जिल्ह्यातील पहिला फर्मान शिलालेख

इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांचे वाचन, अभ्यासक अणवेकर यांचा शोध

पुढारी वृत्तसेवा
रामेश्वर विभूते

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी बन परिसरात असलेल्या सिद्धनाथ मंदिराशेजारी वाहणाऱ्या ओढ्याजवळ एक शिलालेख आढळला. हा जिल्ह्यातील पहिला इनामी फर्मानयुक्त फरमान शिलालेख आहे, असे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांचे म्हणणे आहे.

शिलालेखाच्या सुरुवातीस श्रीचे मंगलस्मरण करण्यात आले आहे. पुढे तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि महसूल प्रशासनातील संबंधित व्यक्तींनी एका विशिष्ट कारणास्तव मौजे शिरनांदगी जमीन व त्याबाबतचे उत्पन्न आणि इनामाचे हक्क प्रदान केल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी इनामाच्या मंजुरीस स्थानिक गणेदार, मुकादम, महालदार तसेच इतर महसूल अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने आणि शासकीय फर्मानाच्या आधारे हा निर्णय नोंदविण्यात आला, असे म्हटले आहे.

इनामामध्ये केवळ शेतीजमीनच नव्हे तर त्या जमिनीवरील झाडे, फळफळावळ, विहीर, पडीक जमीन, ग्रामसीमा, गुरे चारण्याचे हक्क आणि गावाशी संबंधित इतर उपभोगाचे अधिकारही समाविष्ट करण्यात आले. भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा इतर व्यक्तीने या इनामात अडथळा आणू नये, तसेच हा इनाम पूर्वीप्रमाणे चालू ठेवावा, असा आदेश देण्यात आला आहे. हा लेख तत्कालीन महसूल व्यवस्था, गावची प्रशासकीय रचना आणि इनाम व्यवस्थेचा अधिकृत पुरावा म्हणून महत्त्वाचा ठरतो. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी केले आहे.

स्थानिक लोक परंपरेनुसार शिलालेखास शनिदेव मानून त्यावर तेल ओतून पूजा करतात. त्यामुळे शिलालेख तेलाने काळवटला आहे. त्यामुळे लेखातील अनेक अक्षरे बुजून अस्पष्ट झाली आहेत. शिलालेखावर फर्मान कोरण्यात आलेले आहे. तसेच खालील बाजूस गधेगाळ आहे. असे फर्मानयुक्त गधेगाळ शिलालेख सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आहे.
- नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT