Dhairyashil Mohite-Patil Pudhari
सोलापूर

Solapur Politics : मोहिते-पाटील यांच्या हाकेला शिंदेंचा प्रतिसाद

उजनी धरणावर होणाऱ्या चार प्रकल्पांना विरोधाची भूमिका

पुढारी वृत्तसेवा
विनायक पाटील

कुर्डूवाडी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरण येथे चार मोठे प्रकल्प येणार आहेत. यात एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हे प्रकल्प सोलापूर जिल्ह्यासाठी कसे घातक आहेत, हे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील वारंवार सांगत आहेत. त्यांनी सर्व आजी-माजी आमदार खासदार यांना पत्र लिहिली आहेत. त्यांच्या हाकेला प्रतिसाद त्यांचे एकेकाळचे मित्र असलेले माजी आ. संजयमामा शिंदे यांनी दिला आहे.

उजनी धरण येथील पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तसेच एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन तसेच लहान अणुभट्टी असे चार विविध प्रकल्प येणार आहेत. हे चारही प्रकल्प उजनी धरणाजवळ शासकीय ४०० एकर जमिनीमध्ये साकारणार आहेत. शासनाने यासाठी एलओआयची परवानगी दिली आहे. उजनी धरणात आज ४० टक्के गाळ आहे. यातील मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी लवकरच जाणार आहे व इतर पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत. जर हे असे महाकाय प्रकल्प येथे झाले तर उजनी धरणात पाणी राहणार नाही व जिल्हावासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या प्रकल्पाच्या विरोधात जनजागृतीची मोहीम उघडली आहे.

याचा भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबाबतची वस्तूस्थिती जाणून घेण्याची मागणी केली आहे तसेच सोशल मीडियावर या विरोधात रान उठवले आहे. याचाच पुढील भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदारांना तसेच खासदार यांना तीन पानी पत्र पाठवून या होणाऱ्या महाकाय प्रकल्पाच्या वस्तुस्थितीची माहिती शासनाकडून करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प जिल्ह्यासाठी फायदेशीर आहे का घातक आहे. याचा विचार करून पुढील काळात याला विरोध करायचीही विनंती मोहिते-पाटील यांनी केली आहे.

प्रकल्प विरोधी भूमिकेला पाठिंबा मिळण्यासाठी आवाहन

खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळीला या प्रकल्पाची सत्यता जाणून घेऊन या विनाशकारी प्रकल्पाला पाठिंबाबाबत आवाहन केले होते. जिल्ह्यातील कुठल्याही लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा दिला नसला तरी माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे मित्र माजी आ. संजयमामा शिंदे यांनी खा. मोहिते-पाटील यांच्या आवाहनाला सकारात्मक पाठिंबा दिला आहे. शिंदे यांनी एक पत्र प्रसिध्द करुन हा प्रकल्प कसा शेतकरी विरोधी आहे. मच्छीमार विरोधी तसेच प्रदूषण पसरवणारा आहे. यामुळे याविरोधी होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT