माढा : माढा-शेटफळ मार्गावरील खड्डे बुजविणे व रस्त्याच्या कडेला पडलेल्या चरांची दुरुस्ती केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या मार्गावर काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी खड्डे पूर्ववत असून रस्त्याच्याकडेला खोदलेले चरही अद्याप तसेच आहेत. पावसामुळे या चरांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ औपचारिक दुरुस्ती करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि धोकादायक चर तातडीने बुजवून संपूर्ण मार्गाची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च झाल्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे कायम असल्याने शासकीय निधीचा योग्य वापर झाला का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी.- प्रमोद वाकडे, सामाजिक कार्यकर्ता, उपळाई बुद्रुक.