खा. ज्योती वाघमारे Pudhari
सोलापूर

Solapur News: सोलापुरात संभाजी तलाव परिसरात साकारणार शंभूसृष्टी

खा. ज्योती वाघमारे यांच्या प्रयत्नातून साकारणार प्रकल्प; सहा महिन्यांत होणार शब्दपूर्ती

पुढारी वृत्तसेवा
रामेश्वर विभुते

सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये विविध आकर्षक, धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. परंतु शहराच्या वाढवणाऱ्या कक्षा पाहता अक्कलकोट रस्ता आणि विजयपूर रस्त्यावरही असेच स्थळ हवे यासाठी धर्मवीर संभाजी तलाव परिसरात नव्याने शंभूसृष्टी साकारणार असल्याची माहिती खासदार ज्योती वाघमारे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.

मुळात सोलापूर हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी तसेच चहूबाजूने पाण्याने वेढलेले शिव मंदिर आहे. बाजूलाच भक्कम तटबंदी असणारा भुईकोट किल्ला तर खंदक बगीचा, हुतात्मा बगीचा आदी गोष्टी शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. महानगरपालिकेची सुबक आणि सुंदर इमारतही सोलापूरचे वैभव वाढवते; परंतु शहराचा जसजसा विकास होत आहे, लोकसंख्या वाढ होत आहे. त्या पटीमध्ये शहराच्या कक्षाही रुंदावत आहेत. त्यासाठी विजयपूर रस्त्यावर असणाऱ्या धर्मवीर संभाजी तलावाच्या बाजूला रिकाम्या असणाऱ्या परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सृष्टी म्हणजे थोडक्यात शंभूसृष्टी साकारणार आहे.

याचे प्राथमिक बजेट हे २५ लाखांचे असून, त्यामध्ये जर काम झाले नाही तर खासदार निधीतूनही तसेच डीपीडीसी फंडातून निधी उपलब्ध करून सहा महिन्यांतच ही शंभूसृष्टी तयार करण्यात येईल. याचे काम करणारे कलावंत मुंबईचे असून, धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनकार्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे यामध्ये असणार आहेत. सोलापूर हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवरचे गाव आहे. त्यामुळे पर्यटन वाढ व्हावी हा उद्देश आहे. अलमट्टी धरण हे जसे एक पर्यटन केंद्र बनले आहे, त्याच धर्तीवर सोलापूरचा विकास करणे हा उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT