सोलापूर : पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) शक्तिपीठ महामार्गासाठी बार्शी तालुक्यातील नऊ गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. त्याला विरोध दर्शविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, हा आदेश आज गुरुवारपासून (दि. 26) मोजणी पूर्ण होईपर्यंत लागू करण्यात आला. शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक त्या गटांमधील मोजणी दि. 26 व दि. 27 फेब्रुवारी किंवा मोजणीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत केली जाणार आहे.
बार्शी तालुक्यातील संबंधित नऊ गावांतील काही शेतकऱ्यांचा व अन्य काही लोकांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध असून या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याविरूद्ध ग्रामस्थ आंदोलने करत आहेत. परंतू या भूसंपादन प्रक्रियेला विरोध नसलेल्या शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने व भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यासाठी प्रोत्साहन करत असल्याच्या मुद्यांवरून सोलापूर क्र. 1 चे उपविभागीय दंडाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी सोलापूर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 चा आदेश लागू केला आहे.
या कृतीवर बंदी संबंधित गाव हद्दीत बेकायदेशीर जमाव जमवून, मोजणीस अडथळा आणण्याबरोबरच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मोजणी करण्यास विरोध करणे, पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येणे, ज्या गावाची मोजणी ज्या दिवशी होणार आहे, त्या गावातील त्या गटाचे शेतकरी, हितसंबंधीत व्यक्ती खेरीज इतर इसमांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील नऊ गावांमध्ये शक्तीपीठ महामार्गास आवश्यक त्या भूसापंदनासाठी हा आदेश दि. 25 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजलेपासून ते गौडगाव येथील मोजणीची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत या कालावधीत लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग केल्यास ती व्यक्ती शिक्षेस पात्र राहिल.सदाशिव पडदुणे, उपविभागीय दंडाअधिकारी, सोलापूर क्र.1