सोलापूर : रात्र गस्तीच्या दरम्यान शहर गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करतांना या पथकाने केलेल्या कारवाईत सहा दुचाकी व एका मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
संबंधित आरोपीकडून चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. गुरुवारी (दि. 20) करणकुमार हरी राठोड (वय 38, रा. गणेश नगर, नवीन आर.टी.ओ. ऑफीसजवळ) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुमठा नाका येथील क्रीडा संकुलच्या मागील लेप्रसि कॉलनीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे करणकुमार हरी राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील एसएच 13, ईजी 6737 या क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत विचारपूस केली. टु व्हिलर रिकवरी एजंट म्हणून एका फायनान्समध्ये कामाला होतो. मी ते काम सोडले असून ॲक्सेस बँकेत लोन असलेल्या व कर्ज न भरलेल्या सहा दुचाकी शहरातील विविध ठिकाणांवरुन उचलून घेऊन त्या मोटारसायकल ॲक्सेस बँकेच्या डम्प यार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यावरुन त्याच्याकडील सहा दुचाकी जप्त केल्या. नंतर या दुचाकीच्या चोरीचा अभिलेख पडताळणी केली असता, त्या दुचाकीच्या चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
तसेच गोदुताई परुळेकर विडी घरकुल येथील मूजाहीद हमीद मनियार (वय 19) खडी मिशनजवळ, नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी (सध्या रा. ताज मेडीकलच्या पाठीमागे, अशोक चौक) याला गेल्या रविवार रोजी (दि. 16) रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरलेला दहा हजार रुपयांचे मोबाईल संच जप्त केल्याचे उघडकीस आले. शहर गुन्हे शाखेने सहा दुचाकीसह एक मोबाईल संचच्या चोरीसह एकूण सात गुन्हे उघडकीस आणले. चार लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी गुन्हे शाखेचे शामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.