सोलापूर

Solapur Crime: आंतरराज्‍य सात गुन्‍हेगारांना पकडले

कारच्‍या काचा फोडून करत होते चोरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कारच्‍या काचा फोडून त्‍यातील मौल्यवान वस्‍तू, रोख रक्कम चोरणाऱ्या आंतराज्‍य टोळीतील सात सराईत गुन्‍हेगारांना फौजदार चावडी पोलिसांच्‍या पथकाने सोलापुरात पकडले. हे सातही गुन्‍हेगार तामिळनाडूतील तिरुचिरापल्‍ली येथील रहिवासी आहेत.

दि. ६ जुलै रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्‍या हद्दीत तीन ठिकाणी कारच्‍या काचा फोडून साहित्‍य चोरण्यात आले होते. त्‍यानंतर पुन्‍हा २८ जुलै रोजी सिध्देश्वर मंदिर परिसरात तसाच गुन्‍हा घडला. यात कारमधील चार लाख रुपयांची रोख रक्‍कम व इतर साहित्‍य चोरीस गेले होते. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी याप्रकरणाचा तपास करण्याच्‍या सूचना सपोनि संजय क्षिरसागर यांना दिल्या.

त्‍यानुसार तपास करताना सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये सात इसम दिसत होते. पंचकट्टा ते होम मैदान रस्‍त्‍यावरुन सात आरोपींना ताब्यात घेतले. त्‍यांच्‍याकडून चोरीचे तीन लाख रुपये, लॅपटॉप बॅगसह इतर वस्‍तू हस्‍तगत केल्या. त्‍यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

सदरची कामगिरी पो.आयुक्‍त एम. राजकुमार, उपायुक्‍त प्रितम यावलकर, सहा.आयुक्‍त अरुण देवकर, व. पोलिस निरीक्षक महादेव राऊत, विकास देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय क्षीरसागर, शिवानंद भिमदे, कृष्णात बडूरे, रवी धेंडे, सुधाकर माने, विनोद पुजारी, विनोद व्‍हटकर, कुमार शेळके, वसंत गौडनवरुन, दत्‍तात्रय कोळवले, आयाज बागलकोटे, प्रकाश गायकवाड, मच्‍छिंद्र राठोड, बसवराज परीट, पंकज घाडगे, विनायक जाधव, अजय चव्‍हाण, सूरज सोनवलकर यांच्‍यासह इतरांनी पार पाडली.

संशयितांकडून सात गुन्हे उघडकीस

षणमुगंम अमरनाथम, आदिननाथ थंडयुथपाणी, सेरन मुकंधन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रम्‍हण्यम, मनोजकुमार अनबलगन, कमलकन्‍नन गणेसन अशी अटक केलेल्या सशंयीत आरोपींची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून सोलापूर शहरातील दोन, तेलंगणातील दोन, वसई विवार, तुळजापूर व पिंपरी चिंचवड येथील प्रत्‍येकी एक असे सात गुन्‍हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT