सोलापूर : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून सोलापूर जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार वेगाने होत आहे. ऐन दुष्काळातही कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, जिल्ह्यातील २५२ गावांमधील १ हजार २३३ शेतकऱ्यांनी १ हजार ६१९ एकर क्षेत्रावर तुती लागवड केली आहे.
ऑक्टोबर २०२६ अखेर या शेतकऱ्यांनी तब्बल १ लाख ५४ हजार ९०३ किलो रेशीम कोष उत्पादन घेतले असून, त्याच्या विक्रीतून ९ कोटी ७५ लाख ३५ हजार ७८८ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रति एकरी सरासरी ६० हजार २४४ रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने रेशीम शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आर्थिक आधार देत आहे.
जिल्हा रेशीम कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ लाख ३९ हजार ३५० अंडीपुंज व चॉकीचा पुरवठा करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ८४ गावांमधील ४६२ शेतकऱ्यांनी ५९० एकरवर तुती लागवड केली असून, सर्वाधिक ५० हजार ७५५ किलो कोष उत्पादन घेतले आहे. त्यातून ३ कोटी २८ लाख ८९ हजार २४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेशीम संचालनालयाच्या सहकार्याने ही व्यवस्था कार्यान्वित झाली आहे.
तीन वर्षांत ४.३२ लाखांचे अनुदान
रेशीम शेतीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षांत एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत ५७५ लाभार्थी रेशीम शेती करत असून, पहिल्या वर्षी ३ लाख ५ हजार ४४० रुपये, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ६३ हजार ४०० रुपये अनुदान मिळते. यामध्ये तुती लागवड, संगोपन, साहित्य, खते, औषधे आणि कीटक संगोपन गृह उभारणीचा समावेश आहे.
सिल्क समग्र योजनातूनही अनुदान
सिल्क समग्र-२ योजनेंतर्गतही तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपनासाठी अनुदान दिले जाते. एक एकर क्षेत्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ लाख ७५ हजार रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४ लाख ५० हजार रुपये अनुदानाची तरतूद आहे.