सोलापूर : पवित्र पोर्टलद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेला मिळालेल्या शिक्षकांचे गुरुवारी (दि.१७) समुपदेशन होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम लावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरज असलेल्या प्राथमिक शाळांना गुरुजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात निवड झालेल्या ३३२ नवनियुक्त शिक्षणसेवकांची समुपदेशन प्रक्रिया येत्या १७ सप्टेंबरला जवाहरलाल नेहरू वस्तीगृह येथे पार पडणार आहे. या प्रक्रियेनंतर पात्र शिक्षकांना तालुका व गावनिहाय शाळांचे थेट वाटप केले जाईल. जिल्हा परिषदेला ३४९ उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती. त्या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणी दरम्यान १७ उमेदवार गैरहजर राहिल्याने त्यांची निवड व नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण झालेल्या उर्वरित ३३२ मराठी माध्यम शिक्षणसेवकांना या समुपदेशनाद्वारे नियुक्ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
दिव्यांगासह महिलांना मिळणार प्राधान्य
समुपदेशनात सर्वात प्रथम दिव्यांग उमेदवारांना, त्यानंतर महिला उमेदवारांना आणि शेवटी गुणवत्ता व वयोज्येष्ठतेनुसार इतर उमेदवारांना शाळा निवडण्याची संधी दिली जाईल.
पवित्र पोर्टलमधून आलेल्या शिक्षकांना शाळा देण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम लावून ज्या शाळांना गरज आहे, तेथे पहिल्यांदा शिक्षक देणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांची माहिती मागविली आहे. जेथे खरच गरज आहे, त्या शाळांना शिक्षक मिळाल्यास शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.- संजीव चाफाकरंडे, जिल्हाध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती, सोलापूर