सोलापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेच्या (एनएमएमएस) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवीत शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे. निवड झाल्यास नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये, म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा २० डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या लॉगिनमधून भरले जातात. अर्जामध्ये जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची माहिती, विद्यार्थी व मुख्याध्यापकांचे फोटो तसेच स्वाक्षरी ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांत ४८ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. परीक्षेबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
असे आहे परीक्षेचे स्वरूप
एमएटी : बौद्धिक क्षमता चाचणी
९० बहुपर्यायी प्रश्न. कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी बौद्धिक क्षमतांवर आधारित प्रश्न.
एसएटी : शालेय क्षमता चाचणी
९० प्रश्न. सामान्य विज्ञान – ३५ गुण, समाजशास्त्र – ३५ गुण आणि गणित – २० गुण.
परीक्षा : रविवार, २० डिसेंबर २०२६
प्रवेशपत्र : परीक्षेपूर्वी १० दिवस आधी उपलब्ध
निकाल : फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित.
परीक्षेसाठी पात्रतेचे निकष
इयत्ता आठवीत नियमित शिक्षण घेणारा विद्यार्थी
पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ३.५० लाख रुपयांपेक्षा कमी.
इयत्ता सातवीत किमान ५५ टक्के गुण आवश्यक.
अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सातवीत किमान ५० टक्के गुण.
विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांचे विद्यार्थी पात्र नाहीत.
सध्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळ असल्याने शासनाने या परिक्षेची देखील फी माफ करावी, अशी आमची विनंती आहे. अर्ज भरण्यासाठी काही अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांची मदत घ्यावी.- स्वप्नील हसापुरे, मुख्याध्यापक, सोमेश्वर प्रशाला, हत्तूर