Savaleshwar toll plaza clash Pudhari
सोलापूर

Savaleshwar toll plaza clash: सावळेश्वर टोलनाक्यावर राडा

टोल नाक्याचे कर्मचारी विरूद्ध ट्रकचालकांत तुंबळ हाणामारी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर, मोहोळ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर मंगळवारी (दि. 24) सायंकाळी चारच्या सुमारास ट्रकचालक आणि टोलनाक्याचे कर्मचारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. कर्नाटकातील एका ट्रकचालकाला मारहाण केल्यानंतर संतप्त इतर ट्रकचालकांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये टोलनाक्यावरील सर्व बूथ तसेच इमारतीच्या काचांची तोडफोड करण्यात आली.

सावळेश्वर टोल नाक्यावर कर्नाटकातील ट्रकचा (के.ए. 28 2111) चालक आणि टोल कर्मचारी यांच्यात टोल देण्यावरुन बाचाबाची झाली. यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याने संबंधीत ट्रकचालक गंभीर जखमी झाला. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या कर्नाटकातील ट्रक हा सर्व प्रकार पाहून तेथेच थांबले.

चालकाला मारहाण झाल्याचे कळताच कर्नाटकसह इतर ट्रकचालक आक्रमक झाले. त्यांनीही कर्मचाऱ्यांवर उलट हल्ला चढवत टोल नाक्यावर दगडफेक सुरु केली. यामध्ये टोल नाक्यावरील सर्व बुथची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी टोलनाक्याच्या इमारतीच्या काचाही फोडल्या. या प्रकारामुळे टोल कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. त्यानंतर सर्व ट्रकचालकांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. चालकांनी केलेल्या हल्ल्यात चौदापैकी बारा टोलबुथचे नुकसान झाले आहे. टोल प्लाझा मधील बिल्डिंगच्या काचा, संगणक, टेबल, खुर्ची यांचे नुकसान झाले. या प्रकाराची माहिती मिळताच माहोळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. राज्य राखीव दलाची तुकडीलाही पाचारण करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे दुपारी तीन ते सायंकाळी सहावाजेपर्यंत या टोलनाक्यावरून विना टोल वाहतूक सुरू होती. ट्रकचालकांच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी सायंकाळनंतर वाहतूक सुरळीत केली. मोहोळ पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT