सावळेश्वर पुलावर दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला 
सोलापूर

Solapur Savaleshwar bridge accident| सावळेश्वर पुलावर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

वडील गंभीर जखमी; अपघातानंतर संतप्त नागरिकांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर - सोलापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असलेल्या पिता-पुत्राच्या दुचाकीला सावळेश्वर हद्दीतील पुलावर कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रशांत हरी टेकाळे (वय अंदाजे २५ वर्षे, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याचे वडील हरि गजेंद्र टेकाळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले. हरी टेकाळे यांच्यावर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सावळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत हरी टेकाळे आणि त्याचे वडील हरि गजेंद्र टेकाळे हे मोटारसायकल क्रमांक एमएच १३ बीएम ४१९९ वरून सोलापूरच्या दिशेने जात होते. ते सावळेश्वर हद्दीतील पुलावर आले असता त्यांच्या दुचाकीला कंटेनर क्रमांक टीएस ०८ यूबी ४२४४ ने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील प्रशांत टेकाळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर हरी टेकाळे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. जखमी हरी टेकाळे यांना तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर महामार्गावर तणाव

या अपघातानंतर सावळेश्वर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताच्या निषेधार्थ नागरिकांनी काही काळ सोलापूर-पुणे महामार्ग रोखून धरला, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण, या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमीबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अतुल क्षीरसागर हे करीत आहेत.

तरुण प्रशांत टेकाळे यांच्या अपघाती मृत्यूमुळे सावळेश्वर परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT