सोलापूर : जिल्ह्यात 2025 ते 2030 या कालावधीत होणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 15) काढली आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांच्या गावचे संरपंचपद हे राखीव झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अक्कलकोट व करमाळा तालुक्यातील जेऊर, माढा तालुक्यातील टेंभुर्णी, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने त्याठिकाणच्या स्थानिक नेत्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
यापूर्वी 22 एप्रिलला सरपंच आरक्षण सोडत काढली होती. परंतु आरक्षणातील बदलांमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने काढण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्ह्यात आरक्षणाचे नियम पाळले होते. आरक्षण पुन्हा नव्याने काढायचे की कसे करायचे याबाबत जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. नव्यानेच आरक्षण काढण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी सरपंचपदाचे आरक्षण काढले.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एक हजार 25 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आगामी पाच वर्षाच्या निवडणुकीसाठी आरक्षण तालुकास्तरावर काढण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार प्रत्येक तहसीलदारांनी तालुकापातळीवर आरक्षण निश्चित करण्याची पार पाडली. नागरिकांच्या उपस्थितीत मागील आरक्षणाचा विचार करून पुढील पाच वर्षातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हन्नूर गावचे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले आहे. अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या जेऊर गावचे आरक्षण सर्वसाधारणसाठी निश्चित झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या निंबर्गी गावचे व कासेगावचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. होटगी, बोरामणीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग, मंद्रूप, कुंभारी, वडकबाळ या गावचे आरक्षण सर्वसाधारणसाठी निश्चित झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या वडाळा व तिर्हे गावचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
याशिवाय भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे यांच्या मार्डी गावचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. बार्शी तालुक्यातील पानगाव, अंबाबाईचीवाडी, शेळगाव (आर) या प्रमुख ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माढा तालुक्यातील मोडनिंब येथील रहिवाशी डॉ. निशिगंधा माळी यांच्या गावचे आरक्षण सर्वसाधारणसाठी निश्चित झाले आहे. त्याशिवाय माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या निमगाव टे ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. टेंभुर्णी गावचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी निश्चित झाले आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या जेऊरगावचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी निश्चित झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, कौठाळी येथील सरपंचपद सर्वसाधारण, करकंब, पुळूज येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डी गावचे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मोहोळ तालुक्यातील विजयराज डोंगरे यांच्या शेटफळ, पोखरापूर गावचे सरपंचपद सर्वसाधारण तर कुरुल, वडवळ गावचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी निश्चित झाले आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर यांच्या वेळापूर गावचे सरपंचपद व मोहिते-पाटील यांचा गड समजल्या जाणार्या यशवंतनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.