माळीनगर : कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. माळशिरस तालुक्यातील माळीनगर ते तोंडले-बोंडले या दरम्यान महामार्गावरील पथदिवे (स्ट्रीट लाईट) गेली पाच दिवस झाले रात्री बंद असतात. त्यामुळे या मार्गावर भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.
हा पालखी महामार्ग केवळ वारकऱ्यांसाठीच नाही तर सोलापूर मार्गे पंढरपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या हजारो वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. दिवसा या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो, तर रात्रीच्या वेळी वेगात येणाऱ्या वाहनांना अंधारामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. माळीनगर, महाळुंग, श्रीपूर बायपास माळखांबी, तोंडले-बोंडले, अकलूज बायपास ते तोंडले या पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून रात्री लाईट बंद असल्याच्या तक्रारी वाहनचालकांमधून होत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी महामार्गावर मोठमोठे ट्रक, ट्रॅव्हल्स भरधाव वेगात असतात. लाईट नसल्याने समोरून येणारे वाहन, जनावरे किंवा पायी चालणारे वारकरी दिसत नाहीत. यापूर्वीही या मार्गावर अंधारामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
विद्युत देखभालीसाठी नेमलेले कंत्राटदार आणि अधिकारी केवळ कागदोपत्री कामे दाखवतात का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. करोडो रुपये खर्च करून लावलेले पथदिवे जर पेटणारच नसतील तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.
या प्रकरणी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन माळीनगर ते तोंडले दरम्यानचे सर्व पथदिवे तत्काळ सुरु करावेत. रात्रीच्या वेळी होणारा अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी देखभाल यंत्रणा राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी दिला आहे.