सांगोला : अन्न व औषध प्रशासन विभाग व सांगोला पोलिस यांच्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला गुटखा बुधवारी कडलास रोड येथील कचरा डेपो परिसरात नष्ट करण्यात आला.
सार्वजनिक आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या कारवायांदरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.
यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, मंगेश लवटे, सांगोला पोलिस स्टेशनचे पो.स.ई. भातुकडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. संबंधित विभागांनी नागरिकांना गुटखा व इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करू नये. तसेच अशा प्रकारची माहिती आढळल्यास प्रशासनाला कळविण्याचे आवाहन यावेळी केले आहे.
अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभागाकडून जिल्ह्यात गुटखा विक्री व साठवणुकीविरोधात सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत. जप्त केलेला मुद्देमाल वेळोवेळी नष्ट करण्यात येत आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये धाक निर्माण झाला असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पाऊल मानले जात आहे.