Solapur District Bank 
सोलापूर

Solapur District Bank Election : सांगोल्यात बोगस मतदान झाल्याची मोहिते-पाटलांची तक्रार

केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची केली मागणी; पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याचा विरोधकांचा पलटवार

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : जिल्हा बँकेच्या सांगोला मतदान केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही मतदारांच्या हातात मतपत्रिका दिसल्याची चर्चा झाली. यामुळे गोंधळ निर्माण झाला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मतदान केंद्रावर आले. या मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. येथे बोगस मतदान होत असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला.

सांगोला तालुक्यातून बँकेसाठी २२१ मतदार आहेत. त्यापैकी चार मयत आहेत. विविध कार्यकारी संस्था, शेतकरी सहकारी पतसंस्था यासाठी ८० मतदार आहेत. दूध संस्था व व्यक्तिगत सभासद मतदारसंघातील ६३ पैकी ६२ जणांनी मतदान केले. नागरी संस्था, पतसंस्था, बिगर शेती पतसंस्था, नोकरदार पतसंस्था गटातील ६४ पैकी ६३ मतदारांनी मतदान केले. कृषी पणन संस्था शेतीमाल प्रक्रिया संस्था, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाना, ऑईल मिल, सूतगिरणी अशा दहा पैकी नऊ मतदारांनी मतदान केले. अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जाती यासाठी २२१ पैकी २१४ जणांनी मतदान केले.

मतदानानंतर मतपेट्या घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी खासगी वाहनांनी सोलापूरकडे रवाना झाले. यावेळी फक्त एकच पोलिस कर्मचारी बंदोबस्तास होता. त्यामुळे विरोधी पक्षातील काहींनी मतपेटी नेणाऱ्या वाहनांच्या ताफ्यासोबत आपल्या वाहनांनी प्रवास केला.

मतदान केंद्रावरील मतपत्रिका बाहेर नेहून त्‍यावर शिक्‍के मारुन मतदान केल्‍याची तक्रार आल्यानंतर मी घटनास्‍थळी भेट देऊन सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणी केली. त्‍यावेळी असा प्रकार आढळला नाही. तरीही त्‍या केंद्रावरील अहवाल मागवून पुढील कार्यवाही केली जाईल.
- मुकूंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी

मोहिते-पाटलांना पराभव दिसू लागला : आ. देशमुख

खा. मोहिते-पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. तर पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने मतपत्रिकेबाबत विरोधकांनी गोंधळ निर्माण केल्याची टीका आ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT