Sangola Fodder Water Shortage
सांगोला : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून जनावरांच्या चाऱ्याची टंचाई व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने जनावरे भविष्यात कशी सांभाळायची? या चिंतेने रविवारी आठवड्याच्या बाजारात लेकराप्रमाणे सांभाळलेली जनावरे कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ बळीराजावर आली.
खरीप गेले, पावसाचे उत्तरा, हस्त नक्षत्र संपले. परतीच्या पावसावर अवलंबून असलेले शेतकरी व शासन दोघांचीही घोर निराशा झाली आहे. आता पाऊस येण्याची शक्यता फारच कमी आहे. ऑक्टोबर महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे विहिरी, नद्या, नाल्यांमध्ये होते तेवढे पाणीही संपल्याने ते कोरडे पडले असून चाऱ्याचे दर कडाडले आहेत. छावणी अथवा चारा डेपो अद्याप सुरू झाला नाही. शासन व शेतकरी दोघेही परतीचा पाऊस होईल या आशेवर आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन आहे. खिलार जनावरांचा तालुका म्हणून देशात प्रसिध्द असला तरी खिलार जनावरांबरोबर दोन लाखांहून अधिक संकरित गायी असल्याने त्यांची सोय होणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेती निसर्गावर अवलंबून असून यावर्षी एल निनोमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा, उजनी, राजेवाडी तलाव आदी योजनेचे पाणी तालुक्यात येऊ लागल्याने जलक्रांतीही झाली आहे. परंतु, महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस नसल्याने या योजनेचे पाणी फारसे आले नाही आणि जे आले ते फक्त फोटोसेशनसाठी होते. दोन दिवसात पुन्हा नदी, नाले कोरडे पडले. जे पाणी येते ते रोटेशन पध्दतीने न देता शासनाला विनंती केल्यानंतर सोडले जाते. जुलै, ऑगस्टमध्ये नद्याला आलेल्या पुराचे पाणी योजनेत सोडून माण, कोरडा, अनुका, बेलवण नद्यांवरील बंधारे भरून घेतले असते तरी पाणीटंचाई फारशी जाणवली नसती.
तालुक्यात सर्वच राजकीय पक्ष हे भाजप पुरस्कृत पक्ष झाल्याने सर्वच नेतेमंडळींनी एकत्र येऊन पाणी मागण्याऐवजी वेगवेगळे भेटून निवेदन दिले. श्रेयासाठी नेत्यात वाद होऊ नये म्हणून शासनातील सत्तेत असलेल्या मंत्र्यांनीही सर्वांनाच आश्वासन देऊन बरेच दिवस खेळवले, पण पाणी फारसे आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
रविवारीच आठवड्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी येत आहेत. दीड लाखाची संकरित गायीचा दर लाखावर तर पन्नास हजार रुपये खिलार गाय पंचवीस हजार रुपयांना विकण्याची वेळ आली. कारण जनावरे बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे दर कोसळला तरीही २ हजार ३८ जनावरांची विक्री झाली. बाजार भावाप्रमाणे विक्री झालेल्या जनावरांची एकूण किंमत ८ कोटी ६८ लाख ५८ हजार ८०० रुपये होती. परंतु, प्रत्यक्षात सदर जनावरांची विक्री शेतकऱ्याना कवडीमोल किमतीने करावी लागली आहे.
गोधन वाचविण्यासाठी शासनाने छावणी अथवा चारा डेपो लवकर सुरू करावेत, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे. तरीही सदर प्रक्रिया चालू होण्यास दसरा अथवा दिवाळी होईल, अशी चर्चा आहे. तोपर्यंत जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे चालू आहेत, त्यांचा प्रश्न कसा सुटतो, याकडे लक्ष आहे. तोपर्यंत पशुपालकांची समस्या तीव्र होत आहे.