करमाळा : करमाळा तालुक्यातील सीना नदी परिसरातील पाणी ओसरल्यानंतर वाळू माफिया सक्रिय झाला असून अवैधरित्या वाळू चोरण्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे. यामध्ये परांडासह करमाळा तालुक्यातील वाळू चोरांचाही सहभाग आहे. महसूल विभागाने त्यांच्या विरोधात कडक करवाई सुरू केली आहे. दरम्यान बीटरगाव श्री येथे महसूल विभागाकडून कारवाई करत एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून सोळा ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पहाटे साडेतीनच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकाने केली.
मागील वेळी पुरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहत आल्याने सीना नदीत मुबलक वाळूचा साठा दिसून येत आहे. ज्या भागात पाणी ओसरले आहे तेथून वाळू उपसा करण्यासाठी संबंधित वाळूमाफिया समोर आले आहेत. करमाळा व परांडा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर परंडा भागातील वाळूमाफियांसह करमाळा तालुक्यातील काही लोकांचा समावेश आहे.
करमाळा येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकातील पोथरे गावचे तलाठी हर्षल शेंगळे, पोटेगावचे तलाठी विवेक चिंतामणी, बिटरगावचे तलाठी आदित्य मस्तुद, बिटरगावचे पोलिसपाटील शोभा अभिमन्यू यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रात्रीची गस्त घालत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन चाकी ट्रेलरसह एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करत असताना ताब्यात घेतला आहे. सदरची वाळू चोरी ही बिटरगाव श्री येथून जिल्हा परिषद शाळेसमोरून केली जात होती. यामध्ये ट्रॅक्टर चालक दादासाहेब मुरूमकर यांचा समावेश आहे. इतरांचीही माहिती घेणे सुरू आहे.