Solapur Municipal Corporation Pudhari Photo
सोलापूर

Solapur News: नाल्यांच्या आरक्षणाला सत्ताधाऱ्यांचा विरोध

महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव करणार : नरेंद्र काळे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहराच्या विकास आराखड्यात (डीपी प्लॅन) प्रस्तावित करण्यात आलेल्या १२० किलोमीटर लांबीच्या नवीन ७४ नाल्यांच्या आरक्षणाला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. याचा मोठ्या प्रमाणात विकासाला फटका बसणार आहे. मोठ्या प्रमाणात क्षेत्र विनाकारण बाधित होणार आहे. सूचना व हरकती न मागविता केलेल्या या अतांत्रिक पद्धतीच्या आराखड्यास विरोध होत असून यासंदर्भात तातडीने येणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव करून तो शासनास शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी दिली.

शहरातील नवीन ७४ नाले सूचना व शिफारशी न मागविता विकासा आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत या संदर्भात सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी नगरसेवक अनंत जाधव उपस्थित होते. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला.

शहरात ७४ नाल्यांचे नियोजन करताना मॅप, लेव्हल्स व तांत्रिक निकषांचा पुरेसा विचार झालेला नसल्याचा आरोप करत, या विषयावर प्रशासनाने प्रस्ताव न आणल्यास सर्वसाधारण सभेत सभासद प्रस्ताव मांडून नाल्यांचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील ७४ नाल्यांचे रेखांकन करताना आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण झालेले दिसत नाही. अनेक ठिकाणी नाले अर्धवट असून, जिथे स्ट्रॉम ड्रेन किंवा गटाराद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकतो, तिथेही नाल्यांचे आरक्षण दाखविण्यात आले आहे. हे नाले बारमाही नसून केवळ पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. डीपी प्लॅनमध्ये नाले दाखविल्यामुळे नाल्याच्या दोन्ही बाजूंना सहा-सहा मीटर बफर झोन सोडावा लागणार आहे.

सरासरी चार मीटर रुंदीचा नाला गृहित धरला तरी जवळपास ५० फूट जागा विकासासाठी अनुपलब्ध राहणार असून, संपूर्ण शहरात सुमारे ५०० एकर म्हणजेच दोन कोटी चौरस फूट जमीन बाधित होईल, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे हजारो भूखंडधारकांचे नुकसान होईल, अनेक बांधकामांना परवानगी मिळणार नाही, महापालिकेचा भविष्यातील कर महसूल घटेल आणि शहराच्या विकासाला मोठा अडथळा निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी केली. गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनी आयुष्याची पुंजी खर्च करून घेतलेले १ हजार ते २ हजार चौरस फूटांचे प्लॉटही या आरक्षणामुळे अडकण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT