सोलापूर : दुचाकींच्या नव्या सीरीजमधील व्हीआयपी नंबरच्या लिलावातून सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयास 18 लाख 84 हजार रुपयांचा महसूल मिळाला. यातील आठ नंबरसाठी दोनपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले होते.
सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाची दुचाकीसाठी इ.झेड् ही नवी सीरिज सुरु झाली आहे. या सीरिजमधील व्हीआयपी नंबरसाठी अर्ज मागवले होते. या सीरिज मधील 229 नंबरमधून आरटीओला तब्बल 18 लाख 84 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील आठ नंबरसाठी दोनपेक्षा अधिक अर्ज आले होते. 1717 नंबरसाठी सर्वात जास्त सात अर्ज आले होते. ज्याची रक्कम अधिक होती त्यांना हा नंबर देण्यात आला.
4141 तसेच 2700 या दोन नंबरसाठी प्रत्येकी तीन अर्ज आले होते, यामधून सर्वात जास्त बोली लावलेल्या नागरिकास हे नंबर देण्यात आले. दुचाकीसाठी व्हिआयपी नंबर घेण्यासाठी सोलापूरकर पैसे खर्च करीत असल्याचे दिसते. याआधी देखील दुचाकीच्या नव्या सीरिजमधील व्हीआयपी नंबर मधून आरटीओला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे.
जंपिंग नंबरमधून जास्त महसूल मिळण्याची आशा
नव्या सीरिजमधून दुचाकींचे 229 व्हीआयपी नंबर गेले आहेत. ज्यांनी नंबर घेतले आहेत त्यांनी सीरिज संपायच्या आतमध्ये नवीन गाडी घेऊन तो नंबर घेणे बंधनकारक आहे. दुचाकीच्या सीरिजमधील न गेलेला नंबर चारचाकी गाडीसाठी पाहिजे असेल, तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. दरवेळी असे अनेक नंबर घेतले जातात. त्यातून पुन्हा आरटीओला जादा महसूल मिळतो. या सीरिज मधूनही पुढे जास्त महसूल मिळण्याची आशा आहे.