सोलापूर : वाहन तपासणीच्या कारवाईत अधिक पारदर्शकता यावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांसाठी १५ बॉडी वेअर कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. रस्त्यावर वाहन तपासणी करताना अधिकारी आणि वाहनचालकांमध्ये होणारे वाद, गैरवर्तन तसेच कारवाई याबाबतच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम परिवहन विभागाकडून सुरू केला आहे.
वाहन तपासणी, कागदपत्रांची पडताळणी, दंडात्मक कारवाई व वाहनचालकाशी होणारा संवाद याचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यांद्वारे होणार आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान नेमके काय घडले, याचा डिजिटल पुरावा उपलब्ध राहणार आहे. अधिकारी किवा वाहन चालक यांचे परस्परविरोधी तक्रार झाल्यास रेकॉर्डिंगच्या आधारे वस्तुस्थिती पडताळणी करणे प्रशासनाला शक्य होईल.
लाच मागितल्याचा आरोप, तपासणीदरम्यान झालेला वाद अथवा सरकारी कामात अडथळा आणल्यासारख्या घटनांमध्येही हे रेकॉर्डिंग उपयुक्त ठरणार आहे. कॅमेऱ्यांच्या वापरामुळे अधिकारी आणि वाहनचालक दोघांकडूनही नियमांचे पालन होण्यास मदत होईल. कॅमेऱ्यांचा योग्य वापर आणि कार्यपद्धतीबाबत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कारवाईची प्रक्रिया रेकॉर्ड होणार
रस्त्यावर प्रत्यक्ष वाहन तपासणी आणि कारवाई करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांकडे हे कॅमेरे असतील. कारवाईच्या वेळी कॅमेरा सुरू ठेवून तपासणीची नोंद करणे अपेक्षित आहे. यामुळे अधिकारी-वाहनचालक यांच्यातील संवाद आणि कारवाईची प्रक्रिया रेकॉर्ड होणार आहे.
वस्तुनिष्ठ चौकशीसाठी होणार मदत
कारवाईबाबत तक्रार निर्माण झाल्यास बॉडी कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग महत्त्वाचे ठरणार आहे. वाहनाची स्थिती, कागदपत्रांची तपासणी, अधिकाऱ्यांच्या सूचना आणि वाहनचालकाची प्रतिक्रिया याची नोंद उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तक्रारींची चौकशी अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने करता येणार आहे.
गैरसमज होतील कमी
कॅमेरा सुरू असल्याने तपासणीदरम्यान अधिकारी तसेच वाहनचालकांकडून संयमित वर्तन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विनाकारण वाद, गैरवर्तन आणि कारवाईबाबतचे गैरसमज कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, कॅमेऱ्यांचा नियमित आणि योग्य वापर होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक स्पष्ट व उत्तरदायी करण्यासाठी बॉडी कॅमेरे सुरू केले आहेत. कारवाईची नोंद उपलब्ध असल्याने अधिकारी व वाहनचालक यांच्यातील वाद किवा तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करता येईल. कॅमेऱ्यांचा नियमानुसार वापर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर