सोलापूर : आसरा चौक ते रेल्वे पूल सध्या बंद करण्यात आला आहे. पुलाच्या नूतनीकरणासह डागडुजी असे हे काम करण्यात येत आहे. हे काम किती दिवसात पूर्ण होणार, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. महानगरपालिका अधिकारी हे काम आमच्याशी निगडीत नाही असे म्हणत आहेत, तर पुलाचे काम करणाऱ्या रेल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कच होत नाही. आधीच महिला हॉस्पिटल ते जेऊर या रस्त्याचे मजबुतीकरण सुरू आहे. सध्या हॉटेल बालाजी सरोवर ते महिला हॉस्पिटल या भागात काम सुरू असल्याने ही वाहतूक एकेरी झाली आहे. त्यात आता आसरा पूल बंद असल्याने नागरिक हैराण आहेत.
एकाच वेळी ही कामे सुरू झाल्याने नागरिक तर वैतागलेले आहेत, त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. प्रशासनाने सूचवलेले पर्यायी रस्ते पाहिले तर ते अधिकच जिकीरीचे बनले आहे. कारण देण्यात आलेले पर्यायी मार्ग तितके सक्षम नाहीत. आसरा चौकाकडे जुळे सोलापूर व नई जिंदगीकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे आसरा चौकात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी आसरा चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी आदेश काढून आसरा रेल्वे ब्रीज ते आसरा चौक हा रस्ता गुरुवारी (दि. २) रात्री बारा वाजल्यापासून काम संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सांगितले. आदेशाचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा दिला आहे.
रेल्वे पूल बंद करताना किंवा त्यावरील दुरुस्तीच्या कामांमुळे वाहतूक वळवताना रेल्वे प्रशासन, स्थानिक महानगरपालिका किंवा वाहतूक पोलिस यांच्याद्वारे नागरिकांना पूर्वसूचना दिली जाते. यात प्रामुख्याने खालील प्रकारच्या नोटिफिकेशन (सूचना) चा समावेश असतो. प्रमुख वर्तमानपत्रे आणि न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पुलाचे काम सुरू होण्याची किंवा पूल बंद राहण्याची तारीख व कालावधी जाहीर केला जातो. वाहनचालकांसाठी नकाशे आणि पर्यायी मार्गांची माहिती देणारे फलक पुलाच्या सुरुवातीला लावले जातात.
स्थानिक वाहतूक पोलिस किंवा रेल्वे जनसंपर्क विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून अलर्ट जारी केले जातात. परंतु वाहतूक मार्गात बदलाची माहिती प्रदर्शित नाही. केवळ वाहतूक पोलिस येथे दिसून येत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला मार्ग बदलाचे फलक लावलेले नाहीत किंवा तशा ऑनलाईन यंत्रणेव्दारे सूचना किंवा रिल्स, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स प्रसारीत झालेल्या नाहीत.