Solapur Road Issues  
सोलापूर

Solapur Road Issues : खडी टाकून महिना उलटला; पण रस्ताच नाही झाला

जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनीसह अन्य वसाहतीतील चित्र

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनीसह अन्य नगरातील रस्त्यांवर कंत्राटदारांकडून खडी अंथरण्यात आली असून याला महिना उलटून गेला; पण अद्याप डांबरीकरण करण्यात आले नाही. ही खडी उखडली असून या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी स्लिप होऊन अपघात होत आहेत. केवळ, कंत्राटदारांच्या चुकीमुळे या दुचाकीस्वारांना नाहकपणे जखमी व्हावे लागत आहे. या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनी, नवीन आयएमएस शाळा, पाटलीपुत्र, शोभा शहा, रत्नमंजिरी सोसायटी आदी नागरी वसाहतीतील अनेक कच्च्या रस्त्यांवर खडी अंथरलेली आहे. याशिवाय मारुती मंगल कार्यालय व रेणुका नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खडी अंथरलेली आहे. रस्त्यावर खडी टाकून महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. रस्त्यावर पाणी मारून रोलर न फिरवल्याने खडी उखडलेली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या स्लिप होत आहेत. खडी अंथरलेल्या आणि उखडलेल्या रस्त्यांकडे नगर अभियंता कार्यालय, शाखा अभियंता किंवा अन्य अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. खडी टाकून अंथरलेले रस्ते किमान पावसाळ्याच्या अगोदर पक्के होणार का, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

डांबर महागल्याने कंत्राटदारांकडून डांबरीकरणाच्या कामाला विलंब होत आहे. शिवाय, मागणीनुसार डांबर उपलब्ध न झाल्याने ही कामे रखडली आहेत. शेवटचा जो थर असतो, तो पाणीयुक्तच असल्याने पाणी मारलेले नाही. डांबरीकरणाचे काम होईपर्यंत रोलर फिरवून घेण्यात येईल.
- विष्णू कांबळे शाखा अभियंता, महापालिका सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT