करमाळा : गेल्या महिन्याभरापासून केम-टेंभुर्णी मुख्य रस्ता बंद करण्यात आल्याने संपूर्ण शहराची केम गावची वाहतूक ठप्प झाली असून अज्ञात इसमाने केम गावाला उजनीहून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन चक्क जेसीबी लावून खोदून कापून टाकल्याने संपूर्ण गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे केम ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टेंभुर्णी-केम रस्त्याची वाहतूक ठप्प केल्याप्रकरणी प्रशासन मूग गिळून गप्प आहे. आता तर गावचा पाणीपुरवठा ठप्प केल्याने संपूर्ण केम गावचे भवितव्य ऐरणीवर आले आहे. याप्रकरणी तातडीने प्रशासनाने कारवाई न केल्यास गाव बंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
केम-टेंभुर्णी हा मार्ग निवृत्ती महाराज पालखी मार्ग आहे. या मार्गावर मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर रस्ता हा अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी सुरू आहे. सध्या हॅम अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित काही लोकांनी या रस्त्यावर मोठे दगड टाकून मागील एक महिन्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. या प्रकारामुळे एसटी वाहतूक एक महिन्यापासून बंद झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
दि. 14 मे रोजी रात्री केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईन फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा. तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात तहसील प्रशासन, पोलिस प्रशासन, महसूल विभाग, भूमि अभिलेख विभाग, केम ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा संपूर्ण केम गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.