गुळवंची : सोलापूर-बार्शी मार्गावरील शेळगाव शिवारात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. भरधाव कार आणि दुचाकीच्या या धडकेत दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील दोन कष्टाळू तरुणांचा जागीच अंत झाला. राहुल संदीपान पवार (३७) आणि गणेश महादेव क्षीरसागर (३२) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि गणेश हे दोघे आपल्या व्यवसायासाठी मळणी यंत्राच्या दुरुस्तीचे काम घेऊन बार्शीला गेले होते. काम आटोपून आपल्या दुचाकीवरून (MH 13 S 3314) आनंदाने गावाकडे परतत असताना, शेळगाव जवळ समोरून येणाऱ्या टाटा अल्ट्रोझ कारने (MH 13 ES 4530) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या बातमीने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
गणेश क्षीरसागर यांच्या पश्चात पत्नी आणि केवळ अडीच वर्षांचा लहान मुलगा आहे. तर राहुल पवार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. दोघेही तरुण मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे असल्याने दारफळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर-बार्शी रस्ता सध्या 'डेथ ट्रॅप' बनत चालला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.