Arrest Pudhari
सोलापूर

Solapur Crime : रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; दोघांना अटक

एकजण अद्याप फरारच

पुढारी वृत्तसेवा

बार्शी : गोरगरिबांच्या हक्काचे अन्नधान्य असलेल्या रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात उलाढाल करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.

दिगंबर ऊर्फ आप्पा संभाजी सुरवसे आणि विवेक ऊर्फ भगवान संभाजी सुरवसे (दोघे रा. बुरूड गल्ली, बार्शी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण तिघांवर गुन्हा दाखल आहे.

न्यायालयाने संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते अधिकच भूमिगत झाले होते. फरार काळात या दोघांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी जवळपास सात वेळा मोबाईल क्रमांक बदलले, तसेच वेशभूषा बदलून सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये लपून राहत होते.

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. सोलापूर ग्रामीण सायबर विभागाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता, दोन्ही आरोपी बार्शी तालुका पोलिस ठाणे हद्दीतच लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, बाबासाहेब हांडे, प्रदीप जगताप, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, आकाश कांबळे तसेच सायबर विभागाचे राहुल सोनकर आणि विश्वनाथ वस्त्रद यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT