उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या दुर्मिळ माळढोक पक्षाने गावडी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील परिसरात दर्शन दिल्याची चर्चा सुरू असून पक्षी मित्र व पर्यावरण प्रेमीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गा.दारफळ येथील युवक सागर लोंढे हे कळमण रस्त्या शेजारील आरक्षित शंभर एकर परिसरातील माळरानावर बाहेर जात असताना त्यांना दोन माळढोक पक्षी एकत्र असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी खात्री करण्याकरिता माळढोकच्या दिशेने सावकाश जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक माळढोक पक्षी तेथून सरळ पुढे गेला तर दुसरा पक्षी बाजूस गेल्याचे लोंढे यांनी यावेळी सांगितले.
लोंढे यांनी आपल्या मोबाईलमध्ये दूरवरून माळढोक पक्षाचे फोटो काढले असता त्या फोटोत एक माळढोक पक्षी असल्याचे स्पष्ट दिसत असून माळढोक पक्षाचे हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहेत. माळढोक पक्षाने दर्शन दिल्याची माहिती मिळताच नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माळढोक पक्षी दिसला त्या ठिकाणाला भेट देत माळढोक ची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी अभयारण्यातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाला भेट ही दिली आहे. फोटोतील माळढोक पक्षाची मादी असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या फोटो वरून वन कर्मचाऱ्यांच्या टीमकडून माळढोक पक्षी दिसलेल्या ठिकाणाची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून या परिसरात एक माळढोक आहे की दोन पक्षी आहेत याची खात्री करून सर्वांना फोटो व माहिती सांगितली जाईल. असे नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यातील वनाधिकारी, वनपाल यांच्याकडून सांगण्यात आले. तर गेल्या आठ महिन्यापूर्वी नान्नज गंगेवाडी अभयारण्य परिसरात एका मादी माळढोक पक्षाने दर्शन दिल्याचे सांगितले जात होते.
मला मोकळ्या जागेत दोन माळढोक पक्षी दिसले. मी त्यांच्या दिशेने जात असताना एक सरळ गेला व एक बाजूला गेला. मी माळढोक पहिले असे म्हणले तर माझ्यावर विश्वास कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून मोबाईल मध्ये दुरुनच माळढोकचा फोटो काढला यामध्ये एक माळढोक दिसत आहे. – सागर लोंढे (गा.दारफळ)