Solapur Rainfall 
सोलापूर

Solapur Rainfall: पावसाने पाठ फिरवल्याने शेती धोक्यात

पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

हंजगी : यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अक्कलकोट तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिके माना टाकू लागली असून अनेक भागांत जमिनीतील ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

अक्कलकोट तालुक्यात सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी, उगवलेली पिके आता पाण्याअभावी सुकून गेल्या आहेत.पेरणीचे पुरती खर्च वाया गेले आहे.

बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत, मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने साथ न दिल्याने हा खर्चही वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काही भागात दुबार पेरणीची वेळ आली, तर काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिकांना अपेक्षित पाऊस मिळालेला नाही. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका यांसह विविध खरीप पिकांवर शेतकरी सध्या नांगर फिरवताना दिसून येत आहेत.

तालुक्‍यातील विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत घट

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरी, बोअरवेल तसेच अन्य पाणीस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्यास अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

जनावरांच्या चाऱ्याची चिंता

पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होण्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतीसोबतच पशुधनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची परिस्थितीही चिंताजनक बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT