सोलापूर : जून महिना सुरू झाला असला तरी सोलापूर शहरातील उष्णतेचा कहर कायम आहे. शनिवारी दिवसभर कडक ऊन आणि उकाडा आणि पुन्हा अधूनमधून आभाळ अशी परिस्थिती असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हवामानाने अचानक कूस बदलली आणि रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावत सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला. सकाळपासूनच सूर्याची तीव्रता जाणवत होती. जून महिना सुरु होऊनही तापमान ३८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
दुपारच्या सुमारास आभाळ भरुन आले. अनेक ठिकाणी थंड पेये, उसाचा रस आणि फळांच्या रसाच्या गाड्यांवर गर्दी दिसून आली. सायंकाळ साडे चार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली. काही वेळातच शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाबरोबर वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. अर्धा तासात ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हवामान खात्याकडे झाली.
पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील धूळ कमी झाली असून वातावरणात ताजेपणा निर्माण झाला. काही भागांत किरकोळ पाणी साचले असले तरी नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. मुलांनीही पावसात भिजण्याचा आनंद लुटला. दरम्यान पुन्हा पाच वाजल्यानंतर ऊन पडले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.