सोलापूर : श्रावण महिन्यातील पहिल्या दिवसांपासून जलधारा कोसळत असून, त्यात सोलापूरकर चिंब चिंब झाले. सलग दोन दिवसांपासून शहर, जिल्ह्यात भिज पावसाने हजेरी लावल्याने निसर्ग हिरवाईने नटला असून खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
मे महिन्यातील कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्रातील पाऊस जोरदार बरसल्यानंतर मृग, आर्द्रा, पुनवर्र्सु नक्षत्राच्या पावसाने दडी मारली होती. पुष्य नक्षत्राच्या पावसाने 22 जुलैपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. शुक्रवार, दि. 25 पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून जलधारा कोसळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून, ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन घडलेला नाही. शाळकरी मुले, चाकरमान्यांना भिज पावसाचा आनंद लुटतच शाळा, कार्यालये गाठावे लागले.
श्रावण सरीने सर्वत्र गवत, झाडी, झुडपे हिरवीगार झाल्याने सृष्टीने हिरवी शालू नेसल्याचा अनुभूती येत आहे. सिद्धेश्वर तलाव काठोकाठ भरल्याने निसर्ग आणखीनच खुलल्याचे पाहायला मिळत आहे. भुईकोट किल्याचा परिसर हिरवाईने नटला आहे. शहरातील उद्याने, शासकीय मैदानावर फुलझाडी, गवतांने निसर्गाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडला आहे.