सोलापूर : सोलापूर शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, सोमवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी भारतीय हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. पुढील चोवीस तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी दुपारी आकाशात काळेकुट्ट ढग भरुन आले होते. अर्धा तास पाऊस पडला. यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून राहिले. वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. यंदा दिवाळी संपली तरी पावसाने उसंत घेतलेली नाही.
दरवर्षी दिवाळी सणाच्या नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाला थंडीस सुरुवात होते. अद्यापही थंडी सुटलेली नाही. गत मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्याचा हंगाम अद्याप संपला नसल्याची स्थिती आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार ही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. सोलापूरसह, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, रत्नागिरी, लातूर, रायगड, ठाणे, पुणे, सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आधीच बीड, लातूर, सोलापूरला पावसाने यंदा महापुराचा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांसह नदी, ओढेकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये धडकी भरली आहे.