सोलापूर

Solapur News: रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने नेत्यांना गावबंदी

उद्या साखळी उपोषण; निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : नुकतेच पारेवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतर केत्तूर असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर रोजी चुकीच्या शिफारस पत्रावरून नामकरण करण्याचे अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी पारेवाडी ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. सर्व नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

पारेवाडी गावच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. 14 नोव्हेंबर रोजी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र दि. 3 ऑक्टोबर 25 रोजी शासन निर्णय क्रमांक 443 काढलेे आहे, ते रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पारेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

पारेवाडी ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, स्थापनेपासून पारेवाडी रेल्वे स्टेशन असे नाव होते ते योग्यच आहे. पारेवाडी रेल्वे स्थानक व ट्रॅकसाठी पारेवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण गेल्या पन्नास वर्षांपूर्वीच केलेे होते. मोबदलाही शेतकऱ्यांना दिला आहे मात्र चुकीच्या शिफारशीवरून शासनाने परिपत्रकाद्वारे सदर पारेवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून केत्तूर असे परिपत्रक जारी केलेे आहे. विशेष म्हणजे स्थानकाचे नाव बदलण्याबाबत रेल्वेने पारेवाडी ग्रामपंचायतीला कळविले नाही. पारेवाडी स्टेशनचे नाव न बदलता पारेवाडीच ठेवावे; अन्यथा आंदोलन करू, असा ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे.

सध्या पारेवाडी रेल्वे स्टेशनच्या इमारतीला अद्यापही पारेवाडी नाव आहे. शासन आदेश आल्यानंतर प्लॅटफॉर्मला तसेच तिकीट खिडकीला पारेवाडी नाव पुसून केत्तूर या नावाने रंगवण्यात आलेले आहे. या स्टेशनला पारेवाडी म्हणूनच ओळखले जाते. उलट केत्तूर या नावाने लोकांचा संभ्रम होऊन ते लोकांच्या गैरसोयीचे होत असल्याने नवीन लोकांची दिशाभूल होणार आहे.
- गणेश खोटे, उपसरपंच, पारेवाडी.
पारेवाडी रेल्वे स्टेशनला व ट्रॅकला पारेवाडी येथील रहिवाशांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्याच्या मोबदल्यात हेक्टरी 840 रुपये त्यावेळेस अदा केलेले आहेत. पारेवाडी गाव हे स्टेशनच्या जवळ होते. आता केतुर हे गाव पुनर्वसित झाल्याने पारेवाडी स्टेशनजवळ आलेले आहे. त्यामुळे त्यांनी या स्टेशनवर नावासाठी आग्रह धरलेला आहे ते चुकीचे आहे.
- पांडुरंग नवले, पारेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT