सोलापूर : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणाचा चार्ट तयार झाल्यानंतरही गाडीत सीट शिल्लक असतील तर प्रवाशांना गाडी सुटण्याच्या अगोदर १५ मिनिटांपूर्वीही तिकीट कन्फर्म बुकींग करता येणार आहे. या सुविधेमुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही प्रवास सुरक्षिततेसह सुखकारक होणार आहे.
रेल्वेचे आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर अनेक वेळा सीट रिक्त राहतात. या जागांचा उपयोग करून अधिकाधिक प्रवाशांना आरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. उपलब्ध जागांनुसार तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांसह अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे रिक्त जागांचा योग्य वापर होऊन रेल्वेच्या महसुलातही वाढ होते.
मात्र, तिकीट उपलब्धताही संबंधित गाडीतील रिक्त जागांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी बुकिंग करण्यापूर्वी उपलब्धता तपासणे आवश्यक आहे.
जी गाडी १५ मिनिटात धावणार आहे. त्या गाडीत जर काही सीट शिल्लक असतील तर मात्र ऐनवेळी प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांना गाडीत सीट शिल्लक असेल तर त्यांच्या प्रवासाचे आरक्षण निश्चित होते.- जयदीप प्रदक्षिणे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मध्य रेल्वे