सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही नवरत्न कंपनी आहे. ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग, केटरिंग, पर्यटन, रेल नीर आणि हॉस्पिटॅलिटीसह अन्य सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. आठ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रावण विशेष यात्रा रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 जुलै रोजी सोलापुरातून ही श्रावण विशेष रेल्वे धावणार आहे.
शनिवार, दि. 19 जुलै व मंगळवार, दि. 5 ऑगस्ट रोजी मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारत गौरव टूर पॅकेजेसद्वारे या श्रावणात प्रवाशांना संस्मरणीय सुट्टीचा अनुभव घेता येईल. पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा म्हणाले, हे पॅकेज सर्वांना भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्याचा एक अनुकूल आणि सोयीस्कर मार्ग प्रदान करते, जे खिशाला परवडणारे तर आहेच; पण त्याचबरोबर आरामदायी रेल्वे प्रवासाचीही हमी देते.
सोलापूरहून सुरू होणार्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 22 हजार 820 आणि 5 ऑगस्टला मडगावहून सुरू होणार्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 23 हजार 880 आहे. गाडीमध्ये पब्लिक अनाऊन्समेंट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि शुद्ध जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे. आयआरसीटीसीने हे ऑल इन्कलुसिव्ह पॅकेज डिझाईन केले आहे. त्यात कन्फर्म तिकिटासह राहण्याची सोय, पर्यटनाच्या ठिकाणी बसेसने फिरण्याची सोय, ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, टूर गाईड, प्रवास विमा असे सगळे समाविष्ट केले आहे.