सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने जुगार आणि अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. वळसंग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुंभारी येथे सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने तपास करताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी भागात मल्लु सुतार यांच्या मालकीच्या जागेत ‘शिवा कल्याण’ नावाचा मटका जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या ११ आरोपींना रंगेहात पकडले. कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली, एक फॉर्च्युनर कार आणि १९ मोबाईल फोन असा एकूण ३० लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक गणेश शिंदे, रोहन थोरात, माधव लोखंडे, सचिन पवार, शिवकुमार पाटील, खंडेराव कोरे, एहतेशाम शेख, सपोनि राहुल डोंगरे, रविराज कांबळे, कुबर, बनकर आणि गायकवाड यांनी पार पाडली.