सोलापूर : भाजपाने मतचोरी करुन सरकार आणल्याचा दावा करत मतदान चोर, खुर्ची सोड अशा घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बलिदान चौक ते चार हुतात्मा पुतळा दरम्यान महारॅली काढून सरकारच्या विरोधात शुक्रवारी (दि.15) घोषणाबाजी केली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहोत. मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तींना एकसारखाच समान आहे. मात्र, तो अधिकार आज चोरला जात आहे. त्यामुळे लोकशाहीस तडे बसत असून, लोकशाही टिकविण्यासाठी जनतेनेच आवाज उठविले पाहिजे. त्यासाठी काँग्रेसकडून मतदान चोरांच्या विरोधात महारॅली काढण्यात येत आहे. देशात आणि राज्यातील लोकशाही संपत असून, इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदारांना अटक करणे हे लोकशाही संपण्याचे संकेत दिसत आहेत.
यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, विनोद भोसले, रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, मनोज यलगुलवार, सुदीप चाकोते, प्रमिला तूपलवंडे, तिरुपती परकीपंडला, गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे, अनुराधा काटकर, परवीन इनामदार आदी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने मतांची चोरी करुन महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणली आहे. हे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असून, मतचोरीच्या विरोधात शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने महारॅली काढून मतचोरीचा निषेध व्यक्त केला आहे.- सुशील बंदपट्टे,शहर कार्याध्यक्ष, काँग्रेस