सोलापूर : महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेर सादर करण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. यामुळे सोलापूरकरांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 15 मे) सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये एकूण पाच विषयांपैकी चार विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेपुढे भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली संदर्भातील विषयासह इतर 4 विषय देखील मान्यतेसाठी पाठविले होते. भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली प्रस्तावावरून राजकीय स्तरावर जोरदार विरोध झाला होता. मात्र सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांवर तत्काळ कोणतीही कर किंवा दरवाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
याच ‘भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली’चा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे अधिकृतपणे सादर करण्यात आला असल्याने सत्ताधारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. शहराचा वाढता विस्तार आणि स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले विकास प्रकल्प पाहता, महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत अधिक बळकट आणि पारदर्शक करणे आवश्यक असल्याचे प्रस्तावात महापालिका प्रशासनाने नमूद केले होते.
सध्याच्या प्रणालीतील त्रुटीमध्ये एकाच भागात असलेल्या जुन्या आणि नवीन मालमत्तांच्या करात मोठी तफावत आहे. भाडे मूल्यावर आधारित करामुळे महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याची आणि भाडे निश्चितीमध्ये मानवी हस्तक्षेत जास्त असल्याने त्यात मानवीय चुकांचा संभव असल्याचे दाखवत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम 129 नुसार कर योग्य मूल्यावर किंवा भांडवली मूल्यावर बसवता येण्याजोगे मालमत्ता कर व त्यांच्या दरांची तरतूद करण्यात आलेली आहे.