Mahavitaran 
सोलापूर

Solapur heatwave impact: उन्हाच्या झळांचा महावितरणाला फटका

फिडर लाईनची केबल जळाली; मुख्य कार्यालयासह शहरातील वीज गुल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील वाढत्या तापमानाचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर वीज यंत्रणेलाही बसत असल्याचे चित्र सोमवारी समोर आले. नवी चौकी परिसरातील महावितरणच्या फिडर लाईनची केबल अचानक शॉर्ट होऊन जळाल्याने सकाळपासूनच अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दस्तुरखुद्द उमानगरातील महावितरणच्या कार्यालयातील वीज गुल झाली होती.

वीज नसल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले तर दुसरीकडे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेल्या या बिघाडामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन ते अडीच तास युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले.

अखेर नवी पोलिस चौकीजवळील फिडर लाईनमध्ये दोष आढळून आल्यावर केबल बदलण्यात आली आणि दुपारी बाराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या उन्हामुळे केबल बस्ट होऊन हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र या सर्व प्रकारात नागरिकांना अधिक त्रास झाला तो कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे. वीज कधी येणार याची विचारणा करणाऱ्या नागरिकांना आमच्याच कार्यालयात वीज नाही, तुमचे काय घेऊन बसलात? अशी असमाधानकारक उत्तरे देण्यात आली.

या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संतप्त नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडले. काही भागांत पूर्ण वीजपुरवठा खंडित होता. तर काही ठिकाणी अर्धवट पुरवठा सुरू होता. याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्यावर बसला. विशेषतः उंच इमारतींमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. एकंदरीत वाढत्या तापमानासोबतच महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT