पोथरे : करमाळा तालुक्यातील पूनवर येथे मंगळवारी पहाटे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. या पुतळ्याची विनापरवानगी उभारणी झाल्याचे समोर येताच प्रशासनात खळबळ उडाली आहे.
महसूल प्रशासनाचे मंडलाधिकारी राजकुमार पांडेकर, ग्राम महसूल अधिकारी मुरकुट यांनी ही माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिली. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने मंडप टाकून प्रतिष्ठापनेची तयारी सुरु असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याची माहिती गावचे पोलीस पाटील बिभीषण नरसाळे यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ पुतळा उभारल्याच्या ठिकाणी भेट देऊन युवकांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र कसल्याही परिस्थितीत पुतळा काढणार नसल्याचे युवक कार्यकर्ते तसेच गावकऱ्यांनी घेतली आहे. पुतळा उभारल्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पूनवर गावातील राजा शिवछत्रपती मित्र मंडळाचे कार्यकर्ते मयुर सावंत यांचा खासगी जागेत पुतळा उभारल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराजांचा पुतळा खासगी जागेत उभारला गेला असला, तरी प्रशासनाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत तसेच निगा राखण्याबाबत संबंधितांना सूचनेचे पत्र देण्यात येणार आहे.- शिल्पा ठोकडे, तहसीलदार