सोलापूर : आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे डाळिंबाची मागणी घटली असून, तेल्या रोगाच्या भीतीने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत असल्याने दरात मोठी घसरण झाली.
पंधरा दिवसांपूर्वी १२० ते १४० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे डाळिंब सध्या ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. मध्यम प्रतीच्या डाळिंबाला ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीमधील फळ विभागाचे अध्यक्ष फय्याज बागवान यांनी दिली. पण महिनाअखेरीस डाळिंबाचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
सोलापूर बाजार समितीतून आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम येथे डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र त्या भागातील पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केल्याने मागणीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, बागांमध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकरी तयार माल तातडीने बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. त्यामुळे बाजारात उत्तम प्रतीच्या डाळिंबाची आवकही वाढली आहे.