सोलापूर : छटपूजेमुळे परराज्यातून डाळिंबाची मागणी घटल्याने येथील बाजार समितीत डाळिंबाच्या दरात घसरण झाली. शुक्रवारी किलोमागे २०० रुपयांपर्यंत पोहोचलेला डाळिंबाचा भाव शनिवारी १४० रुपयांपर्यंत खाली आला. दुसरीकडे बाजारात डाळिंबाची आवक वाढल्यानेही दरावर परिणाम झाला.
शुक्रवारी बाजार समितीत ३ हजार ८२५ कॅरेट डाळिंबाची आवक झाली होती. शनिवारी मात्र आवकेत मोठी वाढ होऊन ५ हजार ४५६ कॅरेट डाळिंब बाजारात दाखल झाले. कर्नाटकातील इंडी तसेच सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आवक होत आहे. बाजार समितीतून डाळिंब प्रामुख्याने बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये पाठविले जाते. या भागांत छटपूजा साजरी केली जात असल्याने डाळिंबाची मागणी कमी झाली आहे.
शनिवारी लिलावात खरेदी केलेला माल दुसऱ्या दिवसापर्यंत संबंधित राज्यांत पोहोचणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदीलाही मर्यादा आल्या. परिणामी, आवक वाढ आणि मागणी घट या दोन्हींचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला.
कांदा आवकही वाढली
शनिवारी (दि. १४) ३१९ गाड्यांमधून ३१ हजार ९४१ क्विंटल कांदा दाखल झाला. कांद्याला सर्वाधिक ६ हजार २०० रुपये, सर्वसाधारण ३ हजार ५०० रुपये, तर किमान ५०० रुपये भाव मिळाला. शुक्रवारी २० हजार ९४६ क्विंटल आवक झाली होती. त्यावेळी सर्वाधिक ६ हजार ५०० रुपये, सर्वसाधारण ३ हजार १०० रुपये आणि किमान ५०० रुपये भाव होता.