सोलापूर : दक्षिण सोलापूर या आपल्या विधानसभा मतदारसंघात आपल्या समर्थकांना डावलून अन्य ठिकाणच्या लोकप्रतिनिधींच्या तसेच अन्य पक्षातून भाजपमध्ये नव्यानेच आलेल्यांच्या समर्थकांना गट, गणात उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त आ. सुभाष देशमुखांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सर्व प्रकार कानावर घातला. हे असे होणार असेल तर माझा राजीनामाच घ्या, असा पवित्रा घेतला.
दरम्यान, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी आणि दक्षिण मतदारसंघातील प्रभावी नेते दिलीप माने यांच्या समर्थकांना आ. देशमुखांच्या मतदारसंघात देण्यात आलेल्या गट, गणांची उमेदवारी रद्द करण्यात आली. एकूणच या प्रकारामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस उघड झाली. महापालिका निवडणुकीत आ. विजयकुमार देशमुख यांना तर आता गट गणांच्या निवडणुकीत आ. सुभाष देशमुखांना धक्के देण्यास पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. कल्याणशेट्टी यांनी सुरुवात केल्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरदार रंगली.
एकूणच या प्रकारातील गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी आ. देशमुख यांची समजूत काढून तुमच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तुमच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असे आ. देशमुखांना आश्वस्त केले व तशी कृतीही त्वरेने केली. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावान तसेच आ. देशमुखांच्या कार्यकर्त्यांना गट, गणांत संधी मिळाल्याची चर्चा आहे.