सोलापूर ः महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना अजूनही सर्वच पक्षांत असंतोषाची धगधग कायम आहे. भाजपमध्ये सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटात भाजपबरोबर युती करण्यावरून दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सर्वच आलबेल नसल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी होऊनही त्यांच्यातील प्रत्येक पक्षांत नाराजांची संख्या वाढतच आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांच्यात जागावाटपावरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. निष्ठावंत ज्या पक्षातून उभे राहतील त्यांचा प्रचार करू, असे देशमुख आमदारद्वयींनी सांगत पक्षालाच आव्हान दिले. निष्ठावंत आणि उपरे असा संघर्ष सुरू झाल्याने भाजपमध्ये प्रचंड धूसफूस सुरू झाली आहे. एकमेकांच्या मतदारसंघात लक्ष दिल्याने या प्रश्न उद्भवल्याचे सांगत पालकमंत्री गोरे यांनी तीनही आमदारांना फटकारले. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही भाजप सोबत युती करण्यावरून दोन गट पडले आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेनेने महापालिकेतील जागांची मागणी वाढविली आहे. परंतु, निवडणुकीत येणार्या निधीवर डोळा ठेवून एका गटाने युती करायची नाही, असा पवित्रा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातही नाराजीचे वातावरण पसरले आहे. गटनेते किसन जाधव व नागेश गायकवाड यांनी पक्ष सोडत पदाधिकार्यांवर आरोप केले. काही ठिकाणी उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच असल्याने वाद सुरु असल्याचे दिसते. दुसरीकडे महाविकास आघाडी झाली असली तरी त्यांच्यातील सर्वच पक्षात वाद उफाळून येत आहेत. काँग्रेसमध्ये प्रभाग सहा, 14, 20, 21 येथील जागांवरुन वाद होत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण करुन शहराध्यक्षांवर आरोप केले. तर माजी महापौर नलिनी चंदेले, यु.एन. बेरिया यांनी जागा सुटत नसल्याचे दिसताच पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. शिवसेना उध्दव ठाकरे गटात तर निवडणूक जाहिर झाल्यापासून प्रचंड वाद सुरु आहेत. जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि निवडणूक समन्वयक पुरुषोत्तम बरडे असे दोन गट पडले आहेत. प्रभाग सहा, आठ, 13 वरुन पक्षात अंतर्गत वाद आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकांपासून सध्या पुरुषोत्तम बरडे हे लांब असल्याचे दिसते.
माकपामध्येही कमी जागा लढविण्यावरुन कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे कळते. एकंदरीतच सर्वच पक्षात अजूनही धगधग कायम आहे. उमेदवारी जाहीर करुन उमेदवारांना प्रचाराला लावणे गरजेचे असताना पक्षातील जेष्ठ नेते आणि पदाधिकारी मात्र असंतोष शांत करण्यात व्यग्र असल्याचे दिसते.
प्रभाग आठ हा मी प्रभारी असलेला प्रभाग आहे येथील जागा कुणाला विचारुन इतर पक्षांना सोडल्या असा जाब धाराशिवकर यांनी विचारत दासरी यांना बघून घेण्याची भाषा केली. त्यानंतर दासरीही भलतेच खवळले काय बघायचे ते बघून घे असे म्हणत मी देखील बघतो अशी धमकी दिली. त्याचवेळी मनसेचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर आणि दासरी यांच्यातही वादाची ठिणगी उडाली. प्रभाग आठ मधील ओबीसी जागा आम्हाला द्यायचे ठरले होते ती जागा इतर पक्षाला का म्हणून सोडली असा सवाल महिंद्रकर यांनी विचारला.