मंगळवेढा : मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरातील भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस, शिवसेना यांना पक्षाच्या भूमिकेपेक्षा इच्छुक स्थानिक आघाडीकडे जास्त आकर्षित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजपदेखील स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल आहे. मात्र, अद्यापही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होईल, असे सांगितले जात असले तरी इच्छुकांची संख्या सर्वाधिक भाजपमध्ये असल्याने नव्या जुन्यांना कशाप्रकारे न्याय मिळेल, हे काही दिवसात समजणार आहे.
2016 रोजी थेट जनतेतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुणा माळी या नगराध्यक्षा झाल्या होत्या. तब्बल नऊ वर्षांनंतर परत एकदा जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार असल्याने अनेक जणांनी आपली दावेदारी केली आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष अरुणा दत्तू, शिवशंभो प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम, रतन पडवळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यादेखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. एकूण मतदार 28638 असून पुरुष 14251 व स्त्री 14385 व इतर 2 मतदार आहेत. 10 प्रभागांमध्ये 10 पुरुष आणि 10 महिलांना संधी मिळणार आहे.
शेवटची सत्ता तत्कालीन काँग्रेसचे आ. स्व. भारत भालके, राहुल शहा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. नगरसेवकांची मुदत संपल्यापासून नगरपालिकेवर प्रांताधिकारी प्रशासक आहे. शहरातील आघाडीच्या 7 नगरसेवकांनी आवताडे यांना जाहीर मदत केल्यामुळे ते आ. आवताडे यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.बबनराव आवताडे व भगीरथ भालके यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवली असून अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. या गदारोळात नगरपालिकेतील भूमिगत गटार योजना रखडली आहे.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विकास कामांचाही लेखाजोखा मांडला जाईल. यात संतसृष्टी, संत चोखामेळा स्मारक, संत बसवेश्वर स्मारक, अध्यासन केंद्र याशिवाय नगरपालिका हद्दवाढ, नियोजित मास्टर प्लॅन, कचरा व्यवस्थापन, मुलांना क्रीडांगण, शहरात सीसीटीव्ही बसवणे, बगीचा सुशोभित करणे ही कामे रखडली आहेत. तर गेल्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, भव्य नाट्यगृह उभारणी, शहराला थेट पाईपलाईन, स्वतंत्र फीडर, कुंभार तलाव सुशोभीकरण आदी कामे झाली आहेत.