सोलापूर : सोलापूरच्या राजकारणात भाजपने एकाच वेळी चार माजी आमदारांना आपल्या संपर्कात आणल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री झालेल्या चर्चेमुळे सोलापुरातलं राजकारण ढवळून निघालं आहे. दिवाळीपूर्वी भाजपने सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय बॉम्ब टाकल्याचं दिसत आहे. हे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गटातील असल्याच्या चर्चेनं जिल्ह्याचं राजकारण तापलं आहे.
दरम्यान काल संध्याकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौरांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, अजित पवार गटाचे यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार बबन दादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे हे उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर या चार माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला वेग आला आहे. या सर्व माजी आमदारांनी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारानं ही चर्चा पार पडल्याचं सांगितलं जातं.आगामी आठवड्यात फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचा भाजपात औपचारिक प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिलीप माने (काँग्रेस)
सोलापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती आहेत. जिल्ह्यात सहकार क्षेत्रात मजबूत पकड दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोटमध्ये दिलीप माने गट गावागावात सक्रिय या भागातील ते प्रभावशाली नेते मागील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले आणि एनवेळी काढून प्रणिती शिंदे यांनी मध्यस्थी करून उमेदवारी काढून घायला लावली. तेव्हापासून दिलीप माने काँग्रेसवर नाराज आहेत.
राजन पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार गट )
सलग तीन वेळा मोहोळ विधानसभेवर आमदार म्हणून राहिले. सध्या महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वात तरुण वयाच्या 26 व्या वर्षी झाले होते अध्यक्ष. तसेच राज्याचे पंचायतराज समितीचे अध्यक्ष राहिले आहेत त्याचबरोबर लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन आहेत .
यशवंत माने (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
2019 मध्ये मोहोळ मतदारसंघातून विजयी झालेले यशवंत माने यांचा 2024 मध्ये त्यांचा शरद पवार गटाचे राजू खरे यांच्याकडून पराभव झाला आहे. सध्या राजन पाटील यांच्या जवळचे असल्याने त्यांचा भाजपात प्रवेश निश्चित मानला जातो.
बबन दादा शिंदे (राष्ट्रवादी – अजित पवार गट )
माढा मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिलेले बबन शिंदे 1995 ला पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडूण आले आहेत. बबनराव शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने मुलगा रणजीत शिंदे सध्या सक्रिय आहे. रणजीत शिंदे यांनी मागील 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा शरद पवार गटाच्या अभिजीत पाटील यांनी पराभव केला आहे. सोलापुरात भाजपने दिवाळीपूर्वीच राजकीय बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय.या प्रवेशामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गटात आता चिंतेचं वातावरण आहे.