सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील राजकीय वाद आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप आणि आव्हानांची भाषा सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळी बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळू नये, यासाठी भाजप आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या वादाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत असून दोन्ही गटांकडून आक्रमक पोस्ट आणि प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू आहे. त्यातून जातीय तेढ निर्माण होऊ नये किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष केंद्रित केले आहे.
धमकीवजा, आक्षेपार्ह किंवा समाजात दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधून वाद शांत करण्याचे प्रयत्नही पोलिसांकडून सुरू आहेत. ऐन दिवाळीत राजकीय संघर्ष वाढू नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
वाद वाढवणाऱ्या पोस्ट शेअर करू नये
कोठे-नरोटे वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलिस लक्ष ठेवून आहेत. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, धमकी देणाऱ्या किंवा दहशत पसरवणाऱ्या पोस्टची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांना दिली जात आहे. पोस्टची खातरजमा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी वाद वाढवणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ॲट्रॉसिटी गुन्ह्यात दोघांना अंतरिम जामीन
आमदार देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांविरोधात पोलिसांत तक्रार देणारे काँग्रेस कार्यकर्ते तिरुपती परकीपंडला आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते निरंजन बोद्धूल यांच्याविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. नागनाथ म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून जातिवाचक शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दोघांनाही अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या दोघांनीही शुक्रवारी कोठे समर्थकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती.